"मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरलीत हे त्यांनी पाहावं"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 05:45 PM2024-08-10T17:45:05+5:302024-08-10T17:46:14+5:30
बीडमधील उबाठा कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यावर फेकलेल्या सुपाऱ्यावरून प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
छत्रपती संभाजीनगर - आमच्यावर सुपाऱ्या फेकण्यापेक्षा मातोश्री १, मातोश्री २ मध्ये सुपाऱ्यांची किती पोती भरली आहेत हे त्यांनी पाहायला पाहिजे होते. यापुढे उबाठा गट असं काही करणार असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ. आम्ही त्यांचा भ्रष्टाचार उघडा पाडू. त्यांनी सुपाऱ्या फेकल्या आम्ही खोके फेकू असा इशारा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी आरक्षणाच्या वादात मराठवाड्यापासून दौरा सुरू केला. कुठलेही नेते मराठवाड्यात यायला घाबरतात. राज ठाकरेंनी मते स्पष्ट आहेत. जे मनात ते ओठात असते. लोकशाहीत कोणाला मत पटेल, न पटेल हा ज्याचा त्याचा भाग आहे. धाराशिवमध्ये काही मराठा तरूण यांच्याशी राज ठाकरेंनी चर्चा केली. त्यांना त्यांचे मत सांगितले.काल बीडमध्ये जो काही प्रकार झाला, खरेतर उबाठाचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्रिपद मिळावं म्हणून दिल्लीत लोटांगण घालायला गेले, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाआड उबाठाचे काही तुरळक कार्यकर्ते राज ठाकरेंच्या ताफ्यात घुसले आणि त्यांनी तो प्रकार केला असा आरोप त्यांनी केला. एबीपीच्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मनसेने कुठेही विरोध केला नाही. राज ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी चर्चा करून त्यांचे स्पष्ट मत सांगितले होते. ज्या लोकांनी मराठ्यांच्या सहानुभूतीचा फायदा घेऊन लोकसभेत खासदार निवडून आले. त्यांच्यापैकी किती खासदारांनी मराठा आरक्षणावर लोकसभेत तोंड उघडले? शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचे काय मत होते, मग तुम्ही आमच्यासमोर आंदोलन करताय, त्यांना अडवत नाही. प्रकाश आंबेडकर हे त्यांची भूमिका मांडत आहेत मग तुम्ही त्यांच्यासमोर आंदोलन का करत नाही. आम्ही सॉफ्ट टार्गेट आहोत का? असा सवाल करत शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर आंदोलन करा असंही प्रकाश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, २३ जानेवारी १९९४ चा जो जीआर आहे त्यातून हा गुंतागुंत झाली, त्या शरद पवारांसमोर तुम्ही आंदोलन करताय का? पवारांनी काय उत्तरे दिली, मुंबईत मातोश्रीबाहेर आंदोलन झाले त्यात आमचे मराठा नाहीत असं सांगितले गेले. राज ठाकरेंचा पक्ष महाराष्ट्र धर्म म्हणून स्थापन झाला आहे. मराठी माणसांचे हित, मराठी माणसाचा अधिकार, हक्क यासाठी आम्ही बांधील आहोत. मराठी माणसांत सगळेच आले असं प्रकाश महाजन म्हणाले.