मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:35 PM2022-07-28T15:35:57+5:302022-07-28T15:36:25+5:30
साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते असं विधान मनसे नेते प्रकाश महाजनांनी केले आहे.
औरंगाबाद - उद्धव ठाकरे-संजय राऊत यांची मुलाखत पाहिली तर महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी काळू-बाळूचा तमाशा खूप प्रसिद्ध होता. यात एकाने जय महाराष्ट्र बोललं त्याने तिकडून जय महाराष्ट्र बोलायचं. माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडून जय महाराष्ट्र म्हणताना मांजरही म्याव जोरात बोलते असं दिसून येते. बापजाद्याच्या संपत्ती घालवली. पत्रकार यांचा, नेता यांचा, प्रश्न यांचे आणि उत्तरही यांचेच आहेत. आडवा-तिडवा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर मुलाखत पाहिली असती. बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, सत्तेत असताना बाळासाहेबांचे फोटो दिसले नाही. गेलेली इज्जत, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो ठेवला. आपल्यासोबत लोक २५-३० वर्ष काम करतात तेव्हा ते चांगले असतात. परंतु ते सोडून गेले तर त्यांच्याविषयी चांगले बोलता येत नसले तरी वाईट बोलू नये एवढंही मोठं मन नाही. त्रयस्थ म्हणून आजच्या गोष्टीकडे पाहिले तर राजा हा संशयी नसला पाहिजे सावधान असला पाहिजे. शिवाजी महाराज सावधान होते औरंगजेबासारखे संशयी नव्हते. उद्धव ठाकरे संशयी आहेत परंतु सावधान नव्हते. आपल्या सहकाऱ्यांच्या मनात काय चाललंय? ते समजून घ्यावं. स्वत:मध्ये बदल करावा, यात उद्धव ठाकरे कमी पडले असं त्यांनी म्हटलं.
तसेच साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते. आजूबाजूचे लोक सांगत होते त्यावर विश्वास ठेवत बसले. महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आजारपणावर सहानुभूती मिळवतो. डास बसल्यावर खाजवू कसं असा प्रश्न पडला. तुम्ही मुख्यमंत्री होता ४ माणसं सोबत ठेवून पाहिजे तिथे खाजवून घ्यायचं ना. मुलाखतीत हे सांगण्याची गोष्ट आहे का? पर्रिकरांनी कुठल्या अवस्थेत अर्थसंकल्प मांडला ते देशाने पाहिले आहे. खाजवावा हा प्रश्न माजी मुख्यमंत्र्यांना पडत असेल तर जनतेला डोकं खाजवावं लागेल असा खोचक टोला प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, मला या स्थिती गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. अशाप्रकारे समस्या आली तर कुशलतेने सोडवणूक करायचे. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता होईल हे युतीचं सूत्र होते. पण ते आता बिघडले गेले. छोट्या-मोठ्या गोष्टी घडत होत्या परंतु युती तिघांनी तुटू दिली नाही. मनोहर जोशींचा राजीनामा घेतला तेव्हा बाळासाहेबांनी प्रमोद महाजन-गोपीनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता परंतु समन्वय होता. मात्र या तिघांच्या निधनानंतर हा समन्वय संपला असंही महाजनांनी सांगितले.