Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीवरील मोठा डाग, कधीही पुसता येणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 08:41 PM2023-02-15T20:41:31+5:302023-02-15T20:42:14+5:30
Maharashtra News: अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी माफी देऊन त्यांना उपमुख्यमंत्री केले नसते, असा दावाही करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीनंतर आता मनसेने यात उडी घेतली असून, पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीवरचा मोठा डाग आहे. तो त्यांना कधीही पुसता येणार नाही, असे मत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. पण यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली होती. या चर्चेत काय घडले होते, नक्की कोणते मुद्दे होते, हे समजल्यावर त्यातून काही गोष्टी समोर येऊ शकतील, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
विचार करून शरद पवार तीन दिवसात माघारी वळाले असावेत
शरद पवार माघारी का वळाले, असा सवाल प्रकाश महाजन यांना करण्यात आला. यावर, राष्ट्रवादीतील एका गटाने शरद पवार यांना पटवून दिले की, पावसात भिजवून जे कमावले, ते असा शपथविधी करुन जाऊ शकते. त्यांनीही विचार केला असेल की, एक डाग १९७८ चा आपण ४० वर्षापासून घेऊन वावरत आहोत. याचा विचार करुन शरद पवार तीन दिवसात माघारी वळाले असावेत, असा दावा प्रकाश महाजन यांनी केला.
दरम्यान, शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखे आणि न पटण्यासारखे आहे. अजित पवार हे शरद पवारांना न विचारता करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केले नसते, असेही महाजन यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"