"पद मिळालं म्हणून अक्कल येत नाही, यांचे नेते..."; अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:49 PM2024-03-19T13:49:08+5:302024-03-19T13:49:49+5:30
पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. त्यांना नैराश्य आलेले आहे असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर - Prakash Mahajan on Ambadas Danvey ( Marathi News ) नैतिकतेचा अंबादास दानवे आणि त्यांचा पक्षाचा काही संबंध नाही. पद मिळालं म्हणून माणसाला अक्कल येते असं नाही. अंबादास दानवेंची बौद्धिक क्षमता नाही अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून दानवेंनी मनसेवर टीका केली होती. त्याला महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, हिंदुत्वाच्या भूमिकेतून एखादं राजकारण होत असेल तर गैर काय? भाजपा-मनसेची युती नैसर्गिक युती ठरेल. हिंदुत्वाची भूमिका असेल. युती झाली तर वावगं काय?. काँग्रेससोबत जाण्यापेक्षा दुकान बंद करेन असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससोबत गेलात, तुम्ही दुसऱ्यांना बोलावं हा अधिकार काय? शरद पवारांनी तिरस्काराने सांगितले होते, शिवसेनेसोबत युती छे छे आम्ही करणार नाही. त्या शरद पवारांसोबत तुम्ही गेलात ना...अंबादास दानवेंची बौद्धिक क्षमता नाही. त्यांना खासदारकी लढवायची आहे त्या मार्गात खैरे आडवे येतायेय त्यामुळे दानवेंना नैराश्य आलंय. तुमच्या दोघांचे पाहून घ्या. उद्धव ठाकरे तुमच्या दोघांपैकी कुणाला तुकडा टाकणार तेच चघळत बसा, तुम्ही आमची काळजी करू नका असं त्यांनी बजावलं.
तसेच अंबादास दानवेंनी त्यांच्या लायकीप्रमाणे बोलले. यांचा नेता दिल्लीत इतक्या वेळा चक्करा मारतोय ते कुणाचे काय धरायला चक्करा मारतोय हे सांगावे. मध्यंतरी सिनेतारकाच्या कथित आत्महत्या प्रकरणी माझ्या मुलाला वाचवा यासाठी कोण दिल्लीला गेले होते, कुणाचे पाय धरले होते. अंबादास दानवेंनी अंतर्मुख होऊन पाहायला पाहिजे यांचा नेता कुणाचे काय काय धरतोय. शिवाजी पार्कवर कुणीही ठाकरे उपस्थित असतो तेव्हा ठाकरेच शेवटी बोलतात. परवाच्या सभेत उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या आधी बोलले हे दानवेंनी पाहावे. चंद्रकांत खैरे त्यांच्या मार्गात अडथळा आणतायेत त्यांना पाहावे. आमचं कशाला पाहतो असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं.
दरम्यान, पुढच्या अधिवेशनापर्यंतच तांत्रिकदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद अंबादास दानवेंकडे आहे. राज ठाकरे कुणाचे पाय धरायला जात नाहीत. राज ठाकरे मैत्रीला जागणारे आहेत म्हणून लोक त्यांच्या घरी जातात. दानवेंचे साहेब दिल्लीत कुणाचे पाय धरायला गेले होते ते पाहावे. अंबादास दानवेने पातळी सोडल्यावर मी कशाला पातळी सांभाळू. हिंदु्त्व आम्ही सोडलं नव्हते. पण ज्यावेळी आम्ही जाहीर भूमिका घेतली. त्यातून एखादे राजकारण होत असेल तर त्यात गैर काय, या लोकांनी राजकारण केले नाही का? असा सवालही प्रकाश महाजन यांनी विचारला.