हमारे तरीके और तेवर बदले नहीं; मनसेचं भाजपच्या 'त्या' खासदाराला रोखठोक प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 08:41 PM2022-05-05T20:41:17+5:302022-05-05T20:45:28+5:30
राज ठाकरे यांनी माफी मागवी अशा वल्गना कोणी करु नये; मनसेकडून भाजप खासदाराला इशारा
कल्याण: उत्तर भारतीयांच्या विरोधात जी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्यापूर्वी माफी मागावी. अन्यथा त्यांना येऊ दिले जाणार नाही असा इशारा उत्तर प्रदेशातील भाजप खासदारने केले होते. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले, भाजप खासदाराने राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महासंघापुढे केलेले भाषण ऐकावे. त्यानंतर त्यांनी ही भाषा करावी. राज ठाकरे यांनी माफी मागवी अशा वल्गना कोणी करु नये. त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. हमारे तरीके और तेवर इनमे कुछ बदलाव नाही असे तगडे प्रत्युत्तर भाजप खासदाराला मनसे आमदार पाटील यांनी दिले आहे.
कल्याण पूर्व भागातील हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीमधील समाज मंदिराच्या भूमीपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने एका व्यंगचित्रकाराचा गळा घोटला अशी टिका केली होती. या टिकेचाही समाचार घेताना आमदार पाटील यांनी सांगितले की, संजय राऊतांना काही कामधंदे नाहीत. स्वत:चा पक्ष ज्यांनी पवार साहेबांच्या पायाशी नेऊन ठेवला. तेव्हा आम्ही असे बोलायचे का पवार साहेबांच्या माध्यमातून एका फोटोग्राफरचा आणि पक्षाचा गळा घोटला.
अक्षय तृतियेच्या दिवशी मनसे कार्यकत्र्याची पोलिसांनी धरपकड केली. त्यांना नोटिसा बजावल्या. काहींना जिल्हा बंदी केली. यावर आमदार पाटील यांनी सांगितले की, मनसे कार्यकर्ते पदाधिकारी हे काय अतिरेकी, गावगुंड आहेत का. त्याना तुम्ही पकडता. या प्रकरणात पोलिसांना मी दोष देणार नाही. ते त्यांचे काम करीत आहेत. मात्र कुठे तरी लोकांना अडकवून विनाकारण हा बखेडा उभा केला जात आहे. यशवंत जाधव, पाटणकर यांचा मुद्दा मागे पडावा यासाठी सामाजिक मुद्याला सरकारच जातीय स्वरुप देत आहे. त्याचा परिमाण स्वरुप हा गोंधळ सुरु आहे. पाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाली तेव्हाच सरकारने आदेश दिले असते तर आत्ता ही वेळ आली नसती. यूपीला काढले. सर्व धर्माचे काढले. या सरकारला काय अडचण आहे असा प्रति प्रश्न पाटील यांनी उपस्थीत केला आहे.