'बंड झाले, आता थंड झाले? तुमचं सर्व ओक्केच आहे पण..;' मनसेची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:17 AM2022-08-08T10:17:16+5:302022-08-08T10:17:46+5:30
मनसेनं केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार जाऊन ३९ दिवस झाले आहेत. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरांवरील अपात्रतेच्या कारवाईवर सुनावणी सुरु आहे. इतके दिवस झाले असले तरी मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही. तर दुसरीकडे अनेक महानगरपालिकांची मुदत संपली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकाही सध्या झालेल्या नाहीत. दरम्यान, यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
बंड झाले, आता थंड झाले ? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्ह्याला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?, असं म्हणत राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवालही केले आहेत.
बंड झाले,आता थंड झाले ?
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 8, 2022
पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?@mieknathshinde
अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार नाही
नवं सरकार स्थापन होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी मंत्रिमंडळ विस्ता झालेला नाही. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे परंतु या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही अडथळे येण्याचे कारण नाही. येत्या काही दिवसांत सारे चित्र स्पष्ट होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी १२ ऑगस्टला
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सोमवारी होणार नसून येत्या १२ ऑगस्टला होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या कामकाजामध्ये या याचिकेचा उल्लेख नाही. येत्या १२ ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश सोमवारी नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले.