"गद्दारांना क्षमा नाही, ऐकलं होतं ठाण्यात...", मनसेचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 03:45 PM2022-06-23T15:45:06+5:302022-06-23T15:51:30+5:30
Raju Patil : हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. या सर्व घडोमोडींवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. या सर्व घडोमोडींवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.
राजू पाटील यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. "अशी कशी फुटून गेली वाघाची छाती, कारण द्यायचं 'हिंदुत्व', खरंतर 'ईडी'काडीची भीती. 'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात, ४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात," असे म्हणत राजू पाटील यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याचबरोबर, याआधी केलेल्या एका ट्विटमध्ये राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या विधानाची देखील खिल्ली उडवली आहे.
अशी कशी फुटून गेली वाघाची छाती,
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 23, 2022
कारण द्यायचं 'हिंदुत्व', खरंतर 'ईडी'काडीची भीती.
'गद्दारांना क्षमा नाही' ऐकलं होतं ठाण्यात,
४६ जणांचा कोरस गातोय सत्तेसाठीच्या गाण्यात.#सर्व_मिलीभगत_आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. यावर टीका करताना राजू पाटलांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी माझा त्रिफळा उडाला आहे.. पण अम्पायरने मला भेटून, कानात सांगावे की मी आऊट आहे.. तरच मी बॅट सोडेन..अशा खोचक शब्दांत चिमटा काढला आहे.
माझा त्रिफळा उडाला आहे.. पण अम्पायरने मला भेटून, कानात सांगावे की मी आऊट आहे.. तरच मी बॅट सोडेन.. pic.twitter.com/HExpUnsLeG
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 23, 2022
दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे, नक्की विचार होईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.