Maharashtra Politics: “सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रेतील जाहीर सभा उधळून लावणार”; मनसे नेते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 07:11 PM2022-12-05T19:11:13+5:302022-12-05T19:12:14+5:30
Maharashtra News: राज ठाकरे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.
Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानांवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून राज्यातील अनेक ठिकाणे पिंजून काढत आहेत. सुषमा अंधारे सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार आणि मनसेवर टीका करताना दिसत आहे. सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उधळून लावू, असा इशारा मनसे नेत्याने दिला आहे.
सुषमा अंधारे यांनी मुंबईतील एका जाहीर सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. त्याचा उठ दुपारी आणि घे सुपारी… असाच कार्यक्रम असतो. ते अचानक गुहेतून बाहेर येतात. अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, अशी बोचरी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. यानंतर मनसे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा उस्मानाबाद येथे दाखल होत असून, या ठिकाणी जाहीर सभा घेतली जाणार आहे.
सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रा उधळून लावणार
राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी माफी मागावी. अन्यथा त्यांची महाप्रबोधन यात्रा आणि त्यातील सभा उधळून लावू, असा इशारा मनसे जिल्हा प्रमुख राजेंद्र गपाट यांनी दिला आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यावरून मनसे आक्रमक झाली असून, सुषमा अंधारेंनी माफी मागितली पाहिजे, अशी आग्रही मागणी केली जात आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त राज्यभर दौरे करत आहेत. उस्मानाबाद येथे पदाधिकारी यांच्या भेटीगाठी व चर्चा झाल्यानंतर नेहरु चौक आझाद चौक, उस्मानाबाद येथे जाहीर महाप्रबोधन सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, राज्य विस्तारक युवा सेना शरद कोळी तसेच केशव ऊर्फ बाबा पाटील उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"