एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:54 AM2023-12-30T11:54:10+5:302023-12-30T11:54:46+5:30

महाराष्ट्राच्या हिताचा आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी घेतील. त्याचसोबत मराठी माणसाच्या हिताचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलं. 

MNS leader Sandeep Deshpande reaction on Will Eknath Shinde-Raj Thackeray come together? | एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे-राज ठाकरे एकत्र येणार?; मनसे नेत्याच्या विधानानं चर्चेला उधाण

मुंबई - लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्यातील ही सहावी भेट आहे. या भेटीमुळे अनेकांच्या मनात राज ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. राजकीय वर्तुळात हे दोन्ही नेते भविष्यात एकत्र येतील असं बोलले जात आहे. त्यावर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया देत आगामी राजकीय चित्राचे संकेत दिले आहेत. 

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, आत्ताचे मुख्यमंत्री भेटतात. आधीचे मुख्यमंत्री कुणाला भेटत नव्हते. राज्यातील प्रश्नांबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मार्ग निघतो. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपण राजकारणात असतो. त्यामुळे या भेटीतून जनतेचे प्रश्न सुटत असतील तर काही वावगं नाही. राजकारणात कधी काय होईल हे आज सांगता येणार नाही. २०२४ मध्ये काय दडलंय हे माहिती नाही. महाराष्ट्राच्या हिताचा आणि हिंदुत्वाच्या हिताचा निर्णय राज ठाकरे योग्यवेळी घेतील. त्याचसोबत मराठी माणसाच्या हिताचा निर्णय असेल असं त्यांनी म्हटलं. 

तसेच बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडे आहे. वास्तूचा वारसा इतरांकडे असेल. बाळासाहेबांचे विचार, महाराष्ट्राबद्दलची स्वप्नं, हिंदुत्वाची कास राज ठाकरेंकडे आहे. कुठलेही राजकारण करताना मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला यश मिळाले पाहिजे असं धोरण असले पाहिजे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

दरम्यान, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी दोन मोठे नेते एकमेकांना भेटत असतील तर त्यात वावगं नाही. लोकसभा, विधानसभेसह सगळ्या निवडणुका २०२४ मध्ये आहेत. त्याबाबतही चर्चा झाली असेल तर काहीच नाही. हिंदुत्वाच्या दृष्टीने, मराठी माणसाच्या हितासाठी काय चांगले घडणार असेल तर निश्चित महाराष्ट्रातील जनता त्याचे स्वागतच करेल असंही देशपांडे म्हणाले. तसेच प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी कुणाच्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. रामाच्या मनात आले की भक्तांना बोलावून घेतात अशी प्रतिक्रियाही दिली आहे.

Web Title: MNS leader Sandeep Deshpande reaction on Will Eknath Shinde-Raj Thackeray come together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.