“… तेव्हा राज ठाकरेंनी मित्रांनाच काय, भावालाही सोडलं नाही,” संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 02:39 PM2022-09-15T14:39:42+5:302022-09-15T14:39:55+5:30
राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉनचा विषय तापला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय.
राज्यात सध्या वेदांता फॉक्सकॉनचा विषय तापला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. दरम्यान, यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून यावर जोरदार टीका केली होती. तसंच यातून राज ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली होती. यावरून आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
“जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेंव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय, पण भावाला पण सोडलं नाही. त्यामुळे त्याची चिंता सामनानी करू नये. शिवसेनेचं आजच आंदोलन हे नाटक आहे, ज्यावेळेला मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावत होते आणि मनसे महाराष्ट्र भर आंदोलन करत होती, राजसाहेबांना अटक झाली होती. त्यावेळेला शिवसेना मूग गिळून गप्प होती,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला.
जेंव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेंव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही त्यामुळे त्याची चिंता सामना नी करू नये
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 15, 2022
कायम्हटलंहोतंसंपादकीयमध्ये?
मनसेप्रमुख श्राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे, असं शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं होतं.
मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पैठणच्या भाडोत्री सभेत वल्गना केली की, शिवसेनेने मराठी माणसाचे नुकसान केले. अर्थात मुंबईतून मराठी माणूस कमी का झाला, या प्रश्नाचे उत्तर आता त्यांनीच दिले आहे. वेदांता – फॉक्सकॉनसारखे प्रकल्प मुंबई, महाराष्ट्रातून खेचून नेले जात असताना मुख्यमंत्री दाढीची खुंटं उपटत बसल्यानेच मराठी माणसाचे नुकसान झाले आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.