"वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा", संदीप देशपांडे कोणाचा भ्रष्टाचार उघड करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 10:38 AM2021-11-07T10:38:17+5:302021-11-07T10:38:55+5:30
Sandeep Deshpande : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेने सुद्धा महापालिका निवडणुकीसाठी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या कामकाजावरून मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. यातच आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या नेत्यांकडून आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी "वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा", असे म्हणत हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये संदीप देशपांडे मुंबईतील मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा देताना दिसत आहेत. "भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे", असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या मनसेकडून कोणत्या नगरसेवकावर निशाणा साधला जाणार आणि कोणता भ्रष्टाचार बाहेर काढला जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विरप्पन गॅंग चा अजून एक कारनामा pic.twitter.com/52W3sbM79O
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 7, 2021
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा, पदधिकाऱ्यांची बैठक, नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. शिवसेना व भाजपानेही मुंबई महापालिकेची निवडणुक प्रतिष्ठेची केली आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. तर, शिवसेनेनेही भाजपाला शह देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
दुसरीकडे, मनसेकडून आगामी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीत मुंबई महानगर पालिका निवडणुका लढण्यावर आता पासूनच मत मतांतरे सुरु झाले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी पालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतून महायुतीत निवडणूक लढण्याची भूमिका मांडली जात आहे.