"नऊ महिने आपल्या पिल्लाला पोटात वाढवलेल्या आईची या घटनेनंतरची अवस्था आईच समजू शकते"
By जयदीप दाभोळकर | Published: January 9, 2021 06:06 PM2021-01-09T18:06:48+5:302021-01-09T18:13:01+5:30
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांची भावूक पोस्ट
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली असून १७ बालकांपैकी ७ बालकांना वाचविण्यात यश मिळालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी भावूक पोस्ट शेअर या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
"नुकतेच जगात आलेल्या १० नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये (Bhandara District General Hospital) घडली आहे. आपल्या पिल्लाला नऊ महिने पोटात वाढविलेल्या आईची या घटनेनंतर काय अवस्था झाली असेल हे फक्त एक आईच समजू शकते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे," अशी भावूक पोस्ट शालिनी ठाकरे यांनी शेअर केली आहे.
"या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तसंच महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांचा फायर ऑडिटचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला असून त्याची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे," असंही त्या म्हणाल्या.
पंतप्रधानांनीही व्यक्त केलं होतं दु:ख
"महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो," असं पतप्रधान मोदी म्हणाले.
तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं. तसंच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक यांच्याशीदेखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.