“आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?”
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:37 PM2022-09-08T15:37:30+5:302022-09-08T15:38:06+5:30
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा सवाल. उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री असल्याचं वक्तव्य.
शिंदे गटाकडून शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या भूमिकेचा समाचार घेत खऱ्या अर्थानं शिंदे गटाचा खरा चेहरा समोर आला असल्याचं म्हटलं होतं. तसंच आता पितृपक्ष सुरू होतोय आणि पितृपक्षात पितर खाली येतात असं म्हणतात. त्यामुळे बाळासाहेब खाली येतील आणि आम्हीच जिंकू, असं विधान किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री आहे. आजही जर कै.बाळासाहेबच सर्व काही करणार असतील, तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच, पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वतः नक्की काय करणार? शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार!,” असं वक्तव्य शालिनी ठाकरे यांनी केलं. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री आहे.आजही जर कै.बाळासाहेबच सर्व काही करणार असतील,तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच,पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वतः नक्की काय करणार? शिवसैनिकांच्या हातांवर घड्याळ बांधणार! pic.twitter.com/yUboIXkl0T
— Shalini Thackeray (@ThakareShalini) September 8, 2022
काय म्हणाल्या होत्या पेडणेकर?
निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी यावेळी पितृपक्षाचा दाखला दिला. "शिंदे गटाबाबतच्या बऱ्याच गोष्टी आता ओघानं बाहेर येत आहेत. आता पितृपक्ष येत आहे आणि शिवसेना हा पितृपक्षच आहे. बाळासाहेबांचा पितृपक्ष आहे. आमचा पितृपक्ष आहे. असं म्हणतात की पितृपक्षात पितर खाली येतात. त्यावेळी बाळासाहेब नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.