“धनुष्यबाण डोहाळे जेवणसाठी भाड्याने देणे आहे, अशी जाहिरात आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 08:42 AM2022-10-09T08:42:45+5:302022-10-09T08:43:22+5:30
शालिनी ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण
शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला, तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ठाकरे, शिंदे गटाने केली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे? या प्रकरणाबाबतची निवडणूक आयोगासमोरील पुढील सुनावणी आता येत्या सोमवारी, १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, यानंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे.
“जुलै महिन्यात केलेली भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे. उद्याच्या वर्तमानपत्रात जाहिरात आली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. धनुष्यबाण डोहाळे जेवणसाठी भाड्याने देणे आहे...!” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकेचा बाण सोडला आहे.
जुलै महिन्यात केलेली भविष्यवाणी आता खरी होताना दिसत आहे...... उद्याच्या वर्तमानपत्रात जाहिरात आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका......धनुष्यबाण डोहाळे जेवणसाठी भाड्याने देणे आहे...!!!! pic.twitter.com/DFYhj15oxy
— Shalini Thackeray (@ThakareShalini) October 8, 2022
संदीप देशपांडे यांचीही टीका
“संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचं नावही संपलं आणि चिन्हही. कालाय तस्मै नमः” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. “उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे. जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही. तो म्हणजे गरीब, भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे. त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे. ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल.” असंह मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
निवडणूकआयोगाचानिर्णयकाय?
नावाबाबत शिवसेनेतील दोन गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक दिलासा दिला आहे. दोन्ही गटांची जर इच्छा असेल तर शिवसेना हे नाव वापरून त्यापुढे स्वत:च्या गटाचे नाव जोडून ते वापरण्यास आयोगाने हरकत घेतलेली नाही. त्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आपल्याला कोणत्या नावाने ओळखले जावे याचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार निवडणूक आयोगासमोर सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सादर करावे लागती, असे आदेशही देण्यात आले आहेत. त्यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे.