मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; "साहेबांच्या आदेशानंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 08:42 AM2022-05-05T08:42:55+5:302022-05-05T08:43:29+5:30

राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली.

MNS leader Vasant More finally broke the silence, thanking the Muslim community | मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; "साहेबांच्या आदेशानंतर..."

मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; "साहेबांच्या आदेशानंतर..."

Next

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे हटवण्याची आक्रमक भूमिका घेतली. राज यांच्या भूमिकेनंतर पक्षातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले. अनेकांनी राजीनामे दिले. पुण्यात शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसे शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांना जबाबदारी देण्यात आली.

राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. अनेक कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या. या सर्व घडामोडीत पुण्यात मनसेचे वसंत मोरे कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झाला.सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या मोरेंनी अखेर मौन सोडलं आहे. वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय. साहेबांच्या आदेशानंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यातही सहकार्य करू असं सांगितले. त्यामुळे माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे आभार आहेत असं त्यांनी सांगितले.

त्यानंतर वसंत मोरे यांना शिवतीर्थावर बोलवण्यात आले. राज ठाकरे आणि वसंत मोरे यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं सांगत मी राज ठाकरेंसोबतच आहे. मी मनसे सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. राज यांच्या ठाण्यातील उत्तरसभेत वसंत मोरे यांनी भाषण केले. राज ठाकरेंच्या भोंगे हटावच्या आक्रमक भूमिकेमुळे वसंत मोरे यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यातही मोरे दिसले नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. वसंत मोरे मनसे सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु मी राजमार्गावर असं सांगत वसंत मोरे पुन्हा औरंगाबाद येथील सभेत दिसले त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालं.

मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरुन मनसेनं आंदोलन पुकारलेलं असताना मुंबईतील मौलवींनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवी आणि धर्मगुरूंची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत यापुढे पहाटेची अजान लाउडस्पीकर शिवाय केली जाईल असा ठराव संमत करण्यात आला. 'सुन्नी बडी मशिदी'मध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. यात भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते.

Web Title: MNS leader Vasant More finally broke the silence, thanking the Muslim community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.