शिवाजी पार्कवर 'महायुती'चा दिपोत्सव? CM शिंदे, फडणवीस, राज एकाच मंचावर, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 07:53 PM2022-10-21T19:53:17+5:302022-10-21T19:53:37+5:30
आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. यातच, आज मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज यांच्याकडून मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली.
मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमात प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने, आता राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. मनसेच्या वतीने दिपावलीनिमित्त गेल्या १० वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर या दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
यावेळी, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. इश्वराने आपल्याला सुख समाधान आणि ऐश्वर्य द्यावे आपल्या सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावेत. दिवाळी हा महत्वाचा सण आहे. आपल्या या परिसरात लक्ष लक्ष दिवे प्रज्वलित झाले आहेत. या ठिकाणी जो प्रकाश बघायला मिळत आहे तसाच प्रकाश आपल्याही आयुष्यात यावा, अशा सब्दात फडणवीस यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा दिपोत्सव गेल्या १० वर्षांपासून साजरा केला जातो. गेली दोन वर्षं कोरोनामुळे इच्छा असूनही अनेक उत्सव आपल्याला साजरे करता येत नव्हते. सर्वांना सोबत घेऊन ही दिवाळीची सुरुवात राज ठाकरे आणि सर्व सहकारी करतात मी त्यांचे अभिनंद करतो. आपण अनेक ठिकाणी बघतो की, दिवाळीत आपण आकाशकंदील लावून आणि रांगोळ्या काढून आनंद साजरा करतो. आपण नवरात्री आदी कार्यक्रमांत मोकळा श्वास घेतला आणि मोकळे झालो. दिवाळीची चांगली सुरुवात आहे. आनंद घेऊयात.
बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही -
आम्ही ठरवले आहे, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. अनेक लोक भेटतात आपल्याला विनंती करतात. आपण त्यांच्या समस्या सोडवू शकतो. आपण शेतकऱ्यांनाही आधार द्यायला हवा. आमचे सरकार बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढे काही देता येईल, आपण तेवढे देऊ. सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी हे सरकार प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.