हिंदुत्वासाठी महायुतीत गेलो तर आनंदच वाटेल; मनसे नेते बाळा नांदगावकरांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 07:34 PM2024-04-09T19:34:58+5:302024-04-09T19:35:28+5:30
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिल्लीत अमित शाह यांची भेटही घेतली होती. आता आज(दि.9) शिवाजी पार्कावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत असून, यात राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या मेळाव्यापूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
मीडियाशी बोलताना बाळा नांदगावर(Bala Nandgaonkar) म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने राज ठाकरे भूमिका घेतील. 2014 ला आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंच्या विचारांवर मतदान करणारी बरीच लोकं आहेत. आतापर्यंत आम्ही 'एकला चालो रे'च्या भूमिकेत होतो. आता हिंदुत्वासाठी महायुतीत गोलो, तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. पूर्वी शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता एकत्र आलो, तर त्यात काही नवीन नाही, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकरांनी दिली.
दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही महायुतीत जाण्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वीपेक्षा यंदा लोकांची जास्त गर्दी जमली आहे. हे सर्वजण एका अपेक्षेने येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचाच असेल. तर, 2024 ची निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध आहे. राज ठाकरे आपल्या बाजूने असावे, असे प्रत्येक गटाल वाटते. राज ठाकरेंची बाजू धर्माची बाजू आहे, तो जो निर्णय घेतील, तो धर्माचा असेल, अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिली.