मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:33 AM2024-10-05T10:33:49+5:302024-10-05T10:34:54+5:30

मनसेनं राज्यात स्वबळाचा नारा दिला असून येत्या निवडणुकीत ते २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचं बोललं जातं. 

MNS 'Mission Maharashtra'! Raj Thackeray in Marathwada today; Then Nashik, Pune will tour for Maharashtra Election 2024 | मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार

मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार

छत्रपती संभाजीनगर - मागील काही महिन्यांपासून राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यापासून राज यांनी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर विदर्भातही राज यांचा दौरा झाला. आज पुन्हा राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून याठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ३० प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. मनसे या निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असं राज ठाकरेंनी म्हटलं होते. 

राज ठाकरे हे मनसे नेत्यांच्या बैठका घेत आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची विधानसभानिहाय मतदारसंघात समन्वयक म्हणून नेमणूक केली होती. त्या समन्वयकांकडून राज ठाकरे अहवालही देण्यात आले आहेत. राज्यातील राजकारणाचा झालेला खेळ पाहता याला जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मनसे हा पर्याय म्हणून लोक पाहतायेत असा विश्वास राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला होता. त्यामुळे निवडणुकीची रणनीती आखणण्यासाठी राज ठाकरे स्वत: मैदानात उतरून राज्यात विविध ठिकाणी दौरे करत आहेत. 

कसा असणार राज यांचा दौरा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसोबत राज ठाकरे संवाद साधणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील ३० पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर राज ठाकरे ठिकठिकाणी राज्यात दौरे करतायेत. ६ ऑक्टोबरला राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होतील. याठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ते तयारीचा आढावा घेतील. त्यानंतर ७ ऑक्टोबरला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. 

दरम्यान, नुकतेच राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांचा आढावा घेतला. मनसे पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मतदारसंघनिहाय अहवाल राज ठाकरे यांना दिला. मुंबईतील ३६, ठाण्यातील २४, पुणे ग्रामीण ११ आणि पुणे शहरातील आठ जागांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. कुणाला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची आणि किती जागा लढवायच्या याबाबत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: MNS 'Mission Maharashtra'! Raj Thackeray in Marathwada today; Then Nashik, Pune will tour for Maharashtra Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.