Maharashtra Politics: “काही हरकत नाही, पण राज ठाकरेंनी...”; भाजप-शिंदे गट-मनसे युतीबाबत राजू पाटील सकारात्मक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:49 AM2022-10-23T11:49:00+5:302022-10-23T11:49:48+5:30
Maharashtra News: एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: राज्यासह देशात दिवाळी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरी केली जात असून, यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले याची. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यातच मनसे आमदार राजू पाटील यांनीही मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीबाबत भाष्य केले आहे.
दिवाळीनिमित्त एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या आमदार राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजू पाटील यांना मनसे-भाजप-शिंदे गटाच्या युतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, भाजप-शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमधील भेटीगाठींचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मात्र, अशी जर युतीबाबत परिस्थिती निर्माण झाली, तर युती करायलाही हरकत नाही. अशी वेळ आली आणि राज ठाकरेंनी होकार दिला तर आम्हीही त्यासाठी तयार असू, असे राजू पाटील म्हणाले.
काही गोष्टी राजकारण सोडूनही पाहिल्या पाहिजेत
काही गोष्टी राजकारण सोडूनही पाहिल्या पाहिजेत. सरकारमध्ये नसलेल्या आमच्यासारख्या पक्षाला जर सरकारकडून काही सकारात्मक प्रतिसाद येत असेल, आमच्या मागण्या मान्य होत असतील, तर अशा सरकारच्या जवळ येण्यास काही हरकत नाही. मागील सरकारमध्ये कोणी आमच्या मागण्यांची दखलच घेत नव्हते. एखादी मागणी केली की, तर ती मागणी पूर्ण कशी होणार नाही, याकडे जास्त लक्ष दिले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे ही जवळीक वाढली आहे, असे राजू पाटील यांनी नमूद केले.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही या युतीबाबत बोलताना, मनसे बरोबर युती करण्याला कोणतीही अडचण नाही. शिंदे गट-भाजप-मनसे या तिन्ही पक्षाचा बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे या एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"