MNS: 'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', राम मंदिरावरुन मनसेची शिवसेनेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 10:35 AM2022-04-26T10:35:04+5:302022-04-26T10:35:23+5:30
MNS: उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेवर टीका केली होती. त्या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. सोमवारी मुंबईत पार पडलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुविधेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये भाषण करताना त्यांनी भाजपसह हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेवरही अप्रत्यक्ष टीका केली. त्यानंतर आता मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवरुन शिवसेनेचा 'आयत्या पीठावर रेघोट्या मारणारे', असा उल्लेख केला. बजरंग दलाचे मुंबई प्रमुख शंकर गायकर यांचे एक वक्तव्य राजू पाटील यांनी शेअर केले आहे. "बाबरी मशिदीवर मी माझ्या लोकांसोबत चढलो होतो आणि ढाचा आम्ही पाडला. तिथं एकतरी शिवसैनिक होता, असं सिद्ध झालं तर मी माझं आयुष्य त्यांना अर्पण करायला तयार आहे," असं शंकर गायकर म्हणाले होते. हेच वाक्य शेअऱ करत पाटील यांनी सेनेवर निशाणा साधला.
"बाबरी मशिदीवर मी माझ्या लोकांसोबत चढलो होतो आणि ढाचा आम्ही पाडला.तिथं एकतरी शिवसैनिक होता असं सिद्ध झालं तर मी माझं आयुष्य त्यांना अर्पण करायला तयार आहे." - बजरंग दलाचे मुंबई प्रमुख श्री.शंकर गायकर.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 25, 2022
( आयत्या पीठावर रेघोट्या मारणाऱ्यांच्या माहितीसाठी ! )
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
"शिवसेनेने हिंदुत्व सोडले, हे सांगितले जाते. ते काय धोतर आहे का? आमचे घंटाधारी नाही तर गदाधारी हिंदुत्व आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? बाबरी पाडली तेव्हा कुठे बसला होतात? राम मंदीर बांधण्याचे म्हणताय तर तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे, तुमचा नाही, तुम्ही तर ते बांधण्यासाठी हात पसरले," अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली होती.
राणा दाम्पत्यावर टीका
यावेळी उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावरही टीका केली. "तुम्हाला हनुमान चालीसा घरी वाचायची असेल, तशी संस्कृती तुमच्या घरात नसेल तर माझ्या घरी वाचू शकता, परंतू त्याची एक पद्धत असते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, साहेबांच्या काळातही येत होते. पण दादागीरी कराल तर ती मोडून काढू," असा इशारा त्यांनी दिला होता.