मनसेची पाटी कोरी होणार? एकमेव आमदार शिवसेनेच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 03:17 PM2019-03-05T15:17:02+5:302019-03-05T16:33:18+5:30
मनसे आमदार शरद सोनावणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
पुणे: लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मनसेला विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 2009 मध्ये मनसेचे तेरा आमदार होते. मात्र 2014 मध्ये हा आकडा एकवर आला. मात्र आता मनसेचा एकमेव आमदारदेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्यानं मनसेची विधानसभेतील पाटी कोरू होऊ शकते.
2014 च्या विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचा धुव्वा उडाला होता. मनसेचे सर्व आमदारदेखील पराभूत झाले होते. मात्र सोनावणे यांनी जुन्नरमध्ये विजय मिळवत मनसेचा लाज राखली. मात्र आता सोनावणेदेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. सोनावणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ते आजच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे.
शिवसैनिकांनी मात्र आमदार शरद सोनावणे यांना पक्षात घेण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, आम्ही तो स्वीकारणार नाहीत, अशी स्थानिक शिवसैनिकांची भावना आहे. आमची भूमिका ऐकून न घेता सोनावणे यांना उमेदवारी दिल्यास तालुक्यातले सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, असा इशारा देण्यात आला आहे.
शरद सोनावणे यांची भूमिका
मी मूळचा शिवसैनिक असलो तरी राजसाहेबांना फसवून मी कोणताही निर्णय घेणार नाही. शिवसेनेतून अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने मी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा स्थानिक शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. गेल्या 5 वर्षात विकासकामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे जवळचे संबंध आहेत. राज ठाकरे यांच्याकडूनही मला योग्य तो सन्मान मिळत असल्याने जो काही निर्णय घेईल तो राजसाहेबांशी बोलून घेईन, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार शरद सोनवणे यांनी दिली.