पर्वतीमध्ये मनसेची राष्ट्रवादीला साथ; अश्विनी कदम यांचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:05 AM2019-10-14T11:05:03+5:302019-10-14T11:07:40+5:30
पुण्यातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेचा एकमेकांना पाठिंबा मिळाल्याने मनसेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे आणि राष्ट्रवादीच्या पर्वती मतदार संघातील उमेदवार अश्विनी कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत एक उमेदवार उभा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध रान पेटविणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. परंतु, अनेक ठिकाणी राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतीवर भर देत आहे. पुण्यातील दोन मतदार संघात मनसे-राष्ट्रवादी एकत्र आले आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांची चिंता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सुरुवातीला कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवित असलेल्या चंद्रकांत पाटलांना आव्हान देण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. किशोर शिंदे यांनी गेल्या वेळी चांगली फाईट दिली होती. आता राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाल्याने किशोर शिंदे यांचे बळ मिळाले आहे.
राष्ट्रवादीने कोथरूडमध्ये पाठिंबा दिल्यानंतर मनसेने देखील त्याची परतफेड लगेच करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वती मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघातून कदम यांचे पारडे आणखी जड झाले आहे. कदम यांच्यासमोर भाजपच्या माधुरी मिसाळ यांचे आव्हान आहे.
पुण्यातील दोन मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मनसेचा एकमेकांना पाठिंबा मिळाल्याने मनसेचे कोथरूडचे उमेदवार किशोर शिंदे आणि राष्ट्रवादीच्या पर्वती मतदार संघातील उमेदवार अश्विनी कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे.