“राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर...”; मनसे नेत्यांचा सज्जड दम, ‘असा’ असेल कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:46 PM2024-08-13T15:46:31+5:302024-08-13T15:48:38+5:30

Raj Thackeray Vidarbha Visit: राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर तयारीला सुरुवात केल्याची माहिती देण्यात आली आहे.

mns party office bearers warns opposition over raj thackeray vidarbha visit | “राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर...”; मनसे नेत्यांचा सज्जड दम, ‘असा’ असेल कार्यक्रम

“राज ठाकरेंच्या दौऱ्यात अडथळा आणला तर...”; मनसे नेत्यांचा सज्जड दम, ‘असा’ असेल कार्यक्रम

Raj Thackeray Vidarbha Visit: राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. यातच सर्वच पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. राज्यभरात दौरे, बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दावे केले जात आहेत. यातच मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे आता पुन्हा एकदा दौऱ्यावर जाणार आहेत. यावरून मनसे नेत्याने विरोधकांना स्पष्ट शब्दांत दम दिल्याचे सांगितले जात आहे. 

मराठवाडा दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेवरून विरोधकांनी टीका केली. एवढेच नव्हे तर राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी होते, असा दावा राज ठाकरे यांनी केला. ताफ्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून मुंबईत परतताना मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी केली होती. यातच आता राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या परिस्थितीचा तसेच राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

२० ऑगस्टपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता २० ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी राज ठाकरे भंडारा जिल्ह्यातही येणार असून, त्या अनुषंगाने भंडाऱ्याच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे भंडारा संपर्क अध्यक्ष मनदीप रोडे यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. राज ठाकरेंच्या दौऱ्यात जो अडथळा आणेल, तो घरी परत जाणार नाही. जो कोणी या दौऱ्यादरम्यान धुडघूस घालण्याचा प्रयत्न करेल, त्याचा चांगलाच समाचार घेतला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

कसा असेल विदर्भाचा दौरा?

- २० ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून नागपूरला रेल्वेने रवाना होतील. 

- २१ ऑगस्ट रोजी मतदारसंघ निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  

- २२ ऑगस्ट रोजी नागपूर ते भंडारा, भंडारा ते गोंदिया येथे निरीक्षक व पदाधिकारी यांचे बैठक घेतील. 

- २३ ऑगस्टला गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर येथे निरीक्षक पदाधिकारी यांचे बैठक घेतील. 

- २४ ऑगस्टला वणी ते वर्धा असा दौरा असेल. 

- २५ ऑगस्टला अमरावती ते वाशिम असा दौरा राज ठाकरे करतील. 

- २६, २७ ऑगस्टला अकोला बुलढाणा असा हा दौरा असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

Web Title: mns party office bearers warns opposition over raj thackeray vidarbha visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.