Maharashtra Politics: “पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरलं होतं?”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:08 AM2023-02-16T10:08:20+5:302023-02-16T10:10:00+5:30
Maharashtra News: शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ३ दिवसांतच अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी केली, असा दावा करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीनंतर आता मनसेने यात उडी घेतली आहे. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया देताना, पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांच्या पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काय ठरले होते, असा सवाल केला आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या स्फोटक गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात असा काही धमका झाला की, वेगवेगळे अँगल आता समोर येत आहेत. शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतरच, अजित पवारांसोबत शपथविधी झाला, असे फडणवीस म्हणाले. मात्र, शरद पवारांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. आणि सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. जवळपास ४५ मिनिटे पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांमध्ये बैठक झाली. एकीकडे महाविकास आघाडीच्या निर्मितीची बैठक होत होती. तर मग मोदी आणि पवारांमध्ये बैठक कशी काय ? यावर उलटसुलट चर्चाही सुरु झाल्या होत्या. त्यामुळेच फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटात दम आहे, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
अजित पवारांनी फडणवीसांसोबत हातमिळवणी केली
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांचे काय ठरले होते. दिल्लीतील मोदींसोबतच्या बैठकीनंतर ३ दिवसांतच अजित पवारांनी फडणवीसांसोबत हातमिळवणी केली, असेही महाजन म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत, त्यामुळे त्यावर विश्वास ठेवावा लागेल. परंतु, पहाटेचा शपथविधी हा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीवरचा मोठा डाग आहे. तो त्यांना कधीही पुसता येणार नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखे आणि न पटण्यासारखे आहे. अजित पवार हे शरद पवारांना न विचारता करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केले नसते, असेही महाजन यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"