“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 05:09 PM2024-06-14T17:09:08+5:302024-06-14T17:10:00+5:30
MNS Replied To Sanjay Raut: संजय राऊत १५ वर्षे खासदार असून, खासदार निधीतून जनतेची कामे केली नाहीत. राज ठाकरेंवर आरोप करू नये, अन्यथा घरासमोर येऊन उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा मनसेने दिला आहे.
MNS Replied To Sanjay Raut: राज ठाकरे यांचा वाढदिवस मनसैनिकांकडून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी मनसे पक्षाने सुरू केली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मराठी मतदारांसह इतर धर्मियांनी शिवसेनेला मतदान केल्याने मनसेच्या पोटात दुखत आहे. खरे तर सुपारी गँग नसती तर लोकसभेत मविआच्या ३८ जागा जिंकून आल्या असत्या. आता विधानसभेत राज ठाकरेंनी ४०० जागा लढाव्यात. महाराष्ट्रांच्या शत्रूंच्या पालख्या वाहून शिवसेनेचे उमेदवार पाडणे, हा राज ठाकरेंचा एक कलमी कार्यक्रम आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस आजही शिवसेनेच्याच पाठिशी आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला होता. याला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी थेट शब्दांत उत्तर दिले.
संजय राऊतांनी उगाच राज ठाकरेंवर आरोप करू नये
संजय राऊत हे १५ वर्षांपासून खासदार आहे. खासदार निधीतून त्यांनी एकदाही जनतेची कामे केली नाही. संजय राऊतांनी बोलू नये. उगाच आम्हाला तोड उघडायला लावू नये. दिल्लीच्या कोणत्या हॉटेलमध्ये बसून काय धंदे करतात, हे आम्हाला समजते. त्यामुळे संजय राऊतांनी उगाच राज ठाकरेंवर आरोप करू नये, अन्यथा यापुढे त्यांच्या घरासमोर येऊन उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा प्रकाश महाजन यांनी दिला.
संजय राऊत यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही
संजय राऊत यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती. ते त्यांनी करून दाखवले. शिवेसेनेचे दोन तुकडे करू दाखवले. संजय राऊत हे दुसऱ्यांवर सुपारी घेण्याचे आरोप करतात, मात्र, त्यांनी पत्राचाळीची सुपारी घेतली होती. ते शरद पवारांच्या सिल्वर ओकवर दलाली करतात, ते सिल्वर ओकचे सुपारीबाज नेते आहेत. त्यांच्या टीकेवर लक्ष देण्याची गरज नाही, या शब्दांत प्रकाश महाजन यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला.