हा हा हा हा... 'त्या' प्रश्नावर राज ठाकरे फक्त 'मनसे' हसले; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:05 PM2023-07-13T16:05:22+5:302023-07-13T16:05:46+5:30
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवे असा काहींमध्ये सूर आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ जणांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागली. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे जाणार का असा प्रश्न विचारला असता ठाकरेंनी उत्तर देणे टाळले. त्या प्रश्नावर राज ठाकरे फक्त हसले ज्याचा व्हिडीओ मनसेने शेअर केला आहे.
राज ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर असून मनसेने ठाकरेंच्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर केली आहे. तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेत आहेत. राज ठाकरे आज कोकण दौऱ्यावर असून उद्या ते दापोली आणि मंडणगडला जाणार आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? राज ठाकरे म्हणाले...
आम्ही कायम जनभावनेचा आदर केला पण... pic.twitter.com/2eIsfQ9GB4
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 13, 2023
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याची टीका केली होती. पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भाजपवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली जात आहे. वर्षभरापूर्वी देखील अशीच साद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच साद आता मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घालू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईसह विविध भागात 'राज आणि उद्धव' यांनी एकत्र यावे असे पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकावले होते.
राज ठाकरेंना दिलेला त्रास विसरणार नाही - अविनाश जाधव
राज आणि उद्धव एकत्र येणार का? या प्रश्नावर दोन्हीही पक्षातील नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी 'मातोश्री'ने राज यांना दिलेला त्रास विसरणार नसल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव म्हणाले की, मातोश्रीने जो राज ठाकरेंना त्रास दिलाय तो आम्ही कदापि विसरणार नाही. परंतु राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जर साहेबांनी एकला चलोचा निर्णय घेतला तर आम्ही सगळेजण राज ठाकरेंच्या पाठिमागे खंबीर आहोत असेही त्यांनी सांगितले.