निवडून येणाऱ्या माणसांची मोळी म्हणजे राष्ट्रवादी; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 12:56 PM2024-03-09T12:56:20+5:302024-03-09T12:56:49+5:30
राजकारणात जर टिकायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे संयम असं राज ठाकरे यांनी सांगितले.
नाशिक - Raj Thackeray ( Marathi News ) राजकारणात टिकायचे असेल तर संयम हा महत्त्वाचा आहे. गेली १८ वर्ष अनेक चढउतार पाहिले. माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत. इतरांची नाही. राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, गेल्या १८ वर्षात अनेक चढउतार पाहिले, चढ कमी उतारच जास्त पाहिले. या अनेक चढउतारात तुम्ही माझ्यासोबत राहिला. यश तुम्हाला मिळवून देणारच, पण त्यासाठी संयम लागतो. माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा निवडून येणाऱ्या माणसांची मोळी आहे. जे जे निवडून येतात त्यांची मोळी सोबत घेतात आणि हा माझा पक्ष आहे असं सांगतात. शरद पवार नेहमी हेच करत आलेत. आता वेगळे झाले तेही निवडून येणारेच आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच या महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थाने पक्ष स्थापन झाला असेल तर जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यातील ९९ टक्के लोकांचा कधी राजकारणाशी संबंध नव्हता. अविनाश जाधव यासारखे असंख्य ज्यांचा राजकीय काही वारसा नव्हता ते समोर आले. आपली भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती. अनेक विषयांवर बोलायचंय, येत्या ९ एप्रिलला गुढी पाडवा मेळाव्यात बोलेन असंही राज ठाकरे यांनी सांगितले.
राजकारणात संयम ही सर्वात मोठी गोष्ट
आज पक्षाला १८ वर्ष पूर्ण होतायेत. तुम्हाला थोडासा राजकीय इतिहास सांगणे गरजेचे आहे. राजकारणात जर टिकायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे संयम..तुमच्या आजूबाजूला जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे यश तुम्हाला आता दिसतंय. नरेंद्र मोदींचे यश २०१४ सालचं असेल. पण ते संपूर्ण श्रेय त्या पक्षासाठी झटत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. १९५२ साली जनता पक्ष स्थापन झाला, १९८० साली भाजपा नामकरण झाले. ५२ सालापासून इतक्या लोकांनी मेहनत घेतलीय. इतकी वर्षाच्या मेहनतीनंतर मिळालेले हे यश आले.
राजकीयदृष्ट्या सोशल मीडियाचा वापर करा
तुम्ही पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर कन्टेन्ट देत असाल तर ती माहितीपूर्ण द्या. केवळ गाडीतून उतरलो आणि मागे गाणी लावली जातात. त्यातून तुम्हालाही फायदा नाही आणि मलाही नाही. मनसेकडून प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडियाचे व्याख्यान ठेवलं जाईल. सोशल मीडियाचा वापर नेमका कसा करायचा याबाबत माहिती त्यातून दिली जाईल.