सरकारनं मदतीचा हात आखडता घेऊ नये; मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी राज ठाकरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 11:18 AM2024-09-04T11:18:31+5:302024-09-04T11:20:51+5:30
मराठवाड्यातील पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा हाहाकार माजला आहे. याठिकाणी पूरगस्त परिस्थितीमुळे अनेक नागरिकांना स्थलांतरीत व्हावं लागलं तर पूरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून जितक्या लवकर नुकसान भरपाई रक्कम देता येईल ते पाहावे. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारला केली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटवरून म्हटलंय की, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं असं त्यांनी सांगितले.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) September 4, 2024
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे.…
तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे. किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल असा खोचक टीकाही राज यांनी राजकीय नेत्यांवर केली आहे.
दरम्यान, या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.