"मणिपूरमधील दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज ठाकरेंचे मोदी-शहांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 07:05 PM2023-07-01T19:05:26+5:302023-07-01T19:05:51+5:30

मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे.

MNS president Raj Thackeray has written a letter to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to prevent violence in Manipur | "मणिपूरमधील दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज ठाकरेंचे मोदी-शहांना आवाहन

"मणिपूरमधील दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर...", राज ठाकरेंचे मोदी-शहांना आवाहन

googlenewsNext

मुंबई : मणिपूर राज्य मागील जवळपास दोन महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीने जळत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी दौरा करून देखील हिंसा थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अलीकडेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरचा दौरा करून पीडितांची भेट घेतली. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून याप्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. "अशांत मणिपूरमधील हिंसाचारामुळे दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला, मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा", असे राज यांनी म्हटले आहे. 

तसेच ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय हे कळत नाही. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषणं द्यायचे पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन का बाळगलं आहे हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे, असेही राज ठाकरेंनी नमूद केले. 

"पंतप्रधानांनी याप्रकरणात लक्ष घालावं"
"मध्यंतरी देशाचे गृहमंत्री श्री. अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं. असो, मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील अशी भीती वाटते. वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींना आणि गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला मणिपूर पूर्वरत होईल हे पाहा", असे आवाहन राज यांनी केले. 

Web Title: MNS president Raj Thackeray has written a letter to Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah to prevent violence in Manipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.