"आजोबांनी दिलेला ठाकरी बाणा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय", राज ठाकरेंची प्रबोधनकार ठाकरेंना आंदराजली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 12:27 PM2022-11-20T12:27:18+5:302022-11-20T12:28:25+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना आंदराजली वाहिली.
मुंबई : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते आणि इतिहासकार अशी ओळख होती. १७ सप्टेंबर १८८५ रोजी जन्मलेल्या प्रबोधनकारांनी आपल्या लेखणामुळे महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. महाराष्ट्राला लाभलेल्या या रत्नाचा मृत्यू २० नोव्हेंबर १९७३ मध्ये झाला. आज त्यांचा स्मृतीदिन असून यानिमित्ताने प्रबोधनकारांचे नातू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आंदराजली वाहिली आहे.
राज ठाकरेंची प्रबोधनकारांना आदरांजली
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात की, "आज आमच्या आजोबांची - प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला 'ठाकरी' बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी कटाक्षाने आजोबांनी रूजवलेला हा ठाकरी बाणा कायम अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की. आजोबांच्या स्मृतीस अभिवादन."
#प्रबोधनकारठाकरेpic.twitter.com/OpNMgwPSxm
— Raj Thackeray (@RajThackeray) November 20, 2022
...अन् वकील होण्याचे स्वप्न भंगले
प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म पनवेल येथे झाला होता. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण तिथूनच पूर्ण केले. पुढे देवास येथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. वडिलांची नोकरी गेली आणि पनवेलमध्ये पुढील शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे शिक्षण थांबले. त्यामुळे त्यांना कधी बारामतीत तर कधी मध्य प्रदेशातील देवासमध्ये धाव घ्यावी लागली. खरं तर दीड रुपये फी कमी पडल्याने ते मॅट्रिकची परीक्षा देऊ शकले नाहीत आणि त्यांचे वकील होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांनी साईन बोर्ड पेंटिंग, रबर स्टॅम्प बनवणे, बुक बाइंडिंग, वॉल पेंटिंग, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक इत्यादी उद्योग केले. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. त्यांनी संपूर्ण जीवनभर लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी साहित्य निर्मिती केली. अखेर या प्रबोधनकारांची २० नोव्हेंबर १९७३ रोजी प्राणज्योत मालवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"