राज ठाकरे लवकरच नव्या भूमिकेत; जाणून घ्या 'राज' की बात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 06:32 PM2018-08-10T18:32:17+5:302018-08-11T05:34:56+5:30
राजकारण, व्यंगचित्र ही क्षेत्रे हाताळल्यानंतर आता राज ठाकरे एका नव्या भूमिकेतून समोर येत आहेत.
पुणे : राजकीय नेता, व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ता अशी ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता नव्या स्वरूपात महाराष्ट्राच्या भेटीला येत आहेत. काकांकडून व्यंगचित्र, वडिलांकडून संगीताचा वारसा आणि सास-यांकडून नाटकांविषयीची प्रगल्भता असे पैलू जवळून अनुभवले असल्याने त्यांना कलांबददल असलेली आपुलकी वेळोवेळी दिसून आली आहेच. मात्र त्याही पलीकडे जाते ठाकरे आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहीत असल्याचेच समजते. '
त्यांनी लतादीदी यांच्या दुर्मिळ छायाचित्रांसाठी पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेला आज भेट दिली. त्यावेळी त्यांच्या या गुपिताचा उलगडा झाला. या दोनही संग्ग्रहालयात त्यांनी लता दीदी यांचे दुर्मिळ फोटो बघितले. काकांकडून व्यंगचित्र, वडिलांकडून संगीताचा वारसा आणि सास-यांकडून नाटकांविषयीची प्रगल्भता हे पैलू त्यांनी जवळून अनुभवले आहेत. राजकारण, व्यंगचित्र ही क्षेत्रे हाताळल्यानंतर आता राज ठाकरे एका नव्या भूमिकेतून समोर येत आहेत. तेही ‘लेखकाच्या’.
एनएफएआयच्या अमूल्य खजिन्यात लता दीदी यांचे काही जुने तरूणपणातील दुर्मिळ फोटो, काही त्यांचे सासरे मोहन वाघ यांनी काढलेले फोटो संग्रही आहेत .ते पाहिल्यानंतर एनएफएआयकडून त्यांनी हे फोटो मिळण्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान देऊन हे फोटो त्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती एनएफएआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून ‘लोकमत’ला देण्यात आली. आरती कारखानीस यांनी संस्थेतील दुर्मिळ खजिन्याचे दर्शन राज ठाकरे यांना घडविले आणि चित्रपट जतनासाठी करण्यात येत असलेल्या डिजिटलायझेशनसह संग्रहालयातील अमूल्य ठेव्याची माहिती दिली.
संग्रहालयातील छायचित्र, सॉंग्स बुकलेट त्यांनी पाहिली. संग्रहातील ‘सरकारी पाहुणे’चित्रपटा चे पोस्टर त्यांना विशेष आवडले. लता मंगेशकर यांचे दुर्मिळ फोटो, बाबूराव पेंटर, शाहूमहाराज यांचा चित्र काढतानाचा फोटो त्यांना दाखविण्यात आला. चित्रपटांचा संपूर्ण डेटा बेस पाहून ते भारावून गेले. हा खजिना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी अधिकाधिक प्रयत्न व्हायला पाहिजेत, पुस्तकस्वरूपात या गोष्टी यायला पाहिजेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानत असल्याने त्यांनी एनएफएआयच्या संग्रहात असलेल्या ‘किल्ले रायगड’ या दुर्मिळ चित्रफितीचा आस्वादही प्रिव्हू थिएटरमध्ये बसून घेतला. त्यानंतर त्यांनी संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जयकर बंगल्याची पाहाणी केली. या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्पापर्यंत पोहोचले आहे. त्याचेही कौतुक ठाकरे यांनी केले. एफटीआयआयमध्ये त्यांनी जुना स्टुडिओ, एडिटिंग रूमला भेट दिली. तसेच प्रभातच्या जुन्या संग्रहालयालाही त्यांनी भेट दिली. त्यामुळे राजकारणासोबत एका नव्या इनिंगसह ठाकरे सज्ज झाले आहेत.