चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, १ मे रोजी सभा होणारच, मनसे ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:19 PM2022-04-21T14:19:46+5:302022-04-21T14:20:01+5:30
पोलिस प्रशासनाच्या वतीने जागा बदल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याची ठाम भूमिका मनसेनं घेतली आहे.
औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मशिदीवरील भोंगे हटवावे अशी मागणी राज ठाकरेंनी केली. तसेच ३ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसेने दिला. त्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेत औरंगाबाद येथे १ मे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केले. त्यानंतर काही संघटनांनी या सभेला विरोध केला.
मात्र चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, सभा होणारच अशी ठाम भूमिका मनसेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांची संभाजीनगर शहरात ठरलेली सभा एक मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. सर्व परवानग्या मिळाल्या असून मात्र पोलीस प्रशासनाची परवानगी घेण्यासाठी अर्ज करण्यात आला असून, पोलिस प्रशासनाच्या वतीने जागा बदल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
तसेच राज ठाकरे यांच्या सभेच्या माध्यमातून कोणताही जातिवाद निर्माण करायचा नसून मात्र न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी झाली पाहिजे. या हेतूने सदरील सभा औरंगाबाद शहरात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. सध्या राज ठाकरे यांचे भोंग्यांचे राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तापले असून याचे पडसाद औरंगाबाद जिल्ह्यातील दिसून येत आहे. काही संघटनांच्या वतीने राज ठाकरे यांची सभा उधळून लावण्याची धमकी देण्यात आली असून मात्र मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सभा त्याच मैदानावर घेणार असल्यासाठी ठाम आहे.
आम्ही चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, राज ठाकरे यांची 1 मे रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सदरील सभा त्याच दिवशी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे, सदरील पत्रकार परिषदेला मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह विविध पदाधिकार्यांची उपस्थिती होती.