सवरांच्या घरासमोर मनसे करणार निदर्शने
By admin | Published: September 19, 2016 03:03 AM2016-09-19T03:03:45+5:302016-09-19T03:03:45+5:30
पालघर जिल्ह्यात ६०० हून अधिक कुपोषणाने बळी गेले
वाडा : पालघर जिल्ह्यात ६०० हून अधिक कुपोषणाने बळी गेले असून त्याचे गांभीर्य मात्र आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना नाही. त्यांनी केलेल्या मेलेत तर मरू देत ना, या बेजबाबदार विधानाचा निषेध करण्यासाठी मनसे त्यांच्या वाडा येथील निवासस्थाना समोर निर्दशने करणार असल्याची माहिती मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण कदम यांनी मेळाव्या दरम्यान दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुका शाखेच्या वतीने येथील पठारे मंगल कार्यालयात आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले, की सध्या मनसेत मरगळ आली असून ती झटकून कामाला लागा.
प्रत्येक गाव पाड्यात मनसेच्या शाखा निर्माण करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. यावेळी मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मदन पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील, विजय वाडीया, सतिश जाधव, शैलेश बिडवी आदी नेत्यांनी कार्यकत्याना मार्गदर्शन केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष कांतीलाल ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित. (वार्ताहर)