Raj Thackeray : स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:11 AM2023-03-08T11:11:57+5:302023-03-08T11:29:24+5:30

MNS Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर एक खास पोस्ट केली आहे.

MNS Raj Thackeray facebook post Over International Womens Day 2023 | Raj Thackeray : स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण

Raj Thackeray : स्त्रियांनी राजकारणात यावं, मनसे संधी देण्यास उत्सुक; राज ठाकरेंचं 'महिला दिनी' जाहीर आमंत्रण

googlenewsNext

जगभरात आज महिला दिन (International Womens Day) साजरा केला जात आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी फेसबुक आणि ट्विटरवर एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून महिलांना आवाहन केलं आहे. "आज जागतिक महिला दिन. सर्वप्रथम तमाम स्त्रीवर्गाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरू आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे."

"१००, १५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे."

"म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं' हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MNS Raj Thackeray facebook post Over International Womens Day 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.