एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसरीकडे...; बदलापूर घटनेवरून राज ठाकरे भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 03:22 PM2024-08-20T15:22:32+5:302024-08-20T15:24:32+5:30
पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
MNS Raj Thackeray ( Marathi News ) : बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आज नागरिकांचा उद्रेक झाला. संतापलेल्या नागरिकांनी आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या रोखत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. शाळेत लहानग्या मुलींसोबत घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पोलीस प्रशासनाला फटकारत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं आहे.
राज ठाकरे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?" असा सवाल विचारत राज यांनी प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, "माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या," असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं आहे.
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 20, 2024
गृहमंत्रालयाकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत.