“राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

By प्रविण मरगळे | Published: February 26, 2021 03:06 PM2021-02-26T15:06:37+5:302021-02-26T15:09:16+5:30

Marathi Bhasha Din: MNS Raj Thackeray Letter: आपल्या भाषेचं संचित स्मरून इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत... ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो तरी पुरेसं आहे

“MNS Raj Thackeray letter to Marathi people on 27th February Marathi language Day | “राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

“राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

googlenewsNext
ठळक मुद्देया भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला या भाषेने प्रबोधनाचा विचार दिलाया भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला मार्गदर्शक विचार दिलाआपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरू करूया.

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी माणसांना पत्र लिहिलं आहे, सरकारी कॅंलेडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता, पण मनसेने हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायला सुरुवात केल्यावर आपल्या मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे असं राज ठाकरे म्हणाले. (MNS Raj Thackeray Wrote Letter to Marathi People)

वाचा राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र जसं आहे तसंच...

महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे ३५८ दिवस या सगळ्याचा विसर पडेल. मराठीचं काय होणार? यापेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणे हे जास्त महत्त्वाचे आहे.

आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही जिच्यासाठी आसवं गाळत बसावी अशी भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते समर्थ रामदास स्वामींच्या मुखी असलेली ही भाषा, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीजे रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हीच मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण ही मातृभाषा.

लता दीदींच्या आणि आशाताईंच्या गोड गळ्यातून पहिले शब्दाचे निघाले ते ह्याच भाषेतले आणि १८४३ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीला देखील दखल घ्यायला लावली ती देखील मराठी भाषिक रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारे कार्य करणारी आठ भारतरत्न ही माया मराठी भूमीतीलच

या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला मार्गदर्शक विचार दिला अशा भाषेचं काय होईल याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत... ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो तरी पुरेसं आहे

मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखा शाखांमध्ये फलक लावलेले असतील त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली मराठी भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा

तुम्हा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा

जय हिंद जय महाराष्ट्र

Web Title: “MNS Raj Thackeray letter to Marathi people on 27th February Marathi language Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.