परप्रांतीयांविरोधात 'खळ्ळ खट्याक' नंतर मनसेचं आता 'बांगलादेशी हटाव'?
By संदीप प्रधान | Published: January 7, 2020 07:14 PM2020-01-07T19:14:32+5:302020-01-08T08:38:07+5:30
'महाराष्ट्र धर्म' पालनाचा देणार आदेश
- संदीप प्रधान
मुंबई : तुमच्या आजूबाजूला कुणी बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिक रहात असेल तर त्याला शोधून काढा व त्याला हुसकावून लावण्याकरिता आंदोलन करा, असा ठराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २३ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या महामेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या सीएए कायद्यानुसार बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हुसकावून लावण्यात येणार आहे. मनसैनिकांना त्याच कायद्याची अंमलबजावणी करण्याचा संदेश राज देणार आहेत. महाराष्ट्रात हा कायदा लागू करु देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले असल्याने मनसेनी याकरिता हिंसक आंदोलन केले तर मनसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.
राज हे भगव्या वाटेनी जाणार, असे वृत्त 'लोकमत'ने दिले होते. परंतु राज हे आपल्या मनसैनिकांना कोणता कार्यक्रम देणार हे स्पष्ट नव्हते. शिवाय लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोदी-शहांवर टीकास्त्र सोडणारे राज अचानक शिवसेनेनी हिंदुत्व सोडल्याने हिंदुत्वाचा स्वीकार करुन भाजपशी गट्टी कशी करणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. राज हे त्यांची लोंढ्यांच्या विरोधातील भूमिकाच पुढे नेणार आहेत. मात्र यावेळी उत्तर भारतीय, बिहारी नव्हे तर बांगलादेशी हे त्यांच्या रडारवर असणार आहेत.
राज यांनी आपला निळा व हिरवा रंग असलेला झेंडा उतरवून छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा हाती घेत असल्याने ते २३ जानेवारीस मनसैनिकांना 'महाराष्ट्र धर्म' पाळण्याचे आवाहन करणार आहेत. महाराष्ट्र धर्म म्हणजे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील उत्सवांवर म्हणजे गोविंदा पथकांच्या थर लावण्यावर, गणेशोत्सव मंडळांच्या मंडप उभारणीवर न्यायालयाकडून अथवा सरकारकडून बंधने घातली गेली तेव्हा मनसे हीच पाठीशी उभी राहिली. त्यामुळे महाराष्ट्र धर्म मनसेनी पाळला असून तो आपणच पाळणार असल्याचे राज त्या मेळाव्यात सांगतील, अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धर्म व राजकारणाची सांगड घातली ही चूक केली हे विधान अधोरेखित करताना रझा अकादमीच्या आझाद मैदानातील मोर्चाच्यावेळी काही समाजकंटकांनी केलेली नासधूस व महिला पोलिसांवर केलेला हल्ला या विरोधात मनसे उभी राहिली होती, याची आठवण राज करुन देणार आहेत. भाजप व मनसे यांच्यात हातमिळवणीची सुरुवात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मनसेनी पाठिंबा दिला आहे. पुढील वर्षभरात होणाºया सार्वत्रिक निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर भाजप व मनसे यांची युती होऊ शकते.
जानेवारीतील मेळाव्यानंतर गाव तेथे शाखा हा कार्यक्रम मनसे राबवणार असून त्याकरिता राज ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचेही कळते.