Raj Thackeray : "राजघराण्याचा सूर्य मावळतोय..."; महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 12:45 PM2022-09-09T12:45:54+5:302022-09-09T12:53:53+5:30

MNS Raj Thackeray And Queen Elizabeth IIब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलं आहे. 

MNS Raj Thackeray Special Post Over Queen Elizabeth II | Raj Thackeray : "राजघराण्याचा सूर्य मावळतोय..."; महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray : "राजघराण्याचा सूर्य मावळतोय..."; महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची पोस्ट

googlenewsNext

ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयचं (Queen Elizabeth II) गुरूवारी स्कॉटलॅंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये निधन झालं. 96व्या वयात त्या जगाला सोडून गेल्या. एलिजाबेथ द्वितीय 1952 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रिटनची राणी झाली होती. त्यावेळी तिचं वय केवळ 25 वर्षे होतं. ती जगातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जिला परदेश दौरा करताना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज पडत नव्हती. सध्याच्या स्थितीत 15 देशांची महाराणी राहिलेली एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे अब्जो रूपयांची संपत्ती सोडून गेली आहे. ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी देखील ट्विट केलं आहे. 

"ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. 70वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 ह्यांच्यामुळे" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? त्यांची गरज आहे का?"

"ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं."

"कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो"

"कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरू होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अभिवादन" असं राज ठाकरे यांनी आपल्य़ा पोस्टमध्ये म्हटलं आहे. महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या नेटवर्थबाबत वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जातात. Fortune नुसार, महाराणी एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे 500 मिलियन डॉलर म्हणजे 39,858,975,000 रूपयांची संपत्ती सोडून गेली. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्सला मिळणार.
 

Web Title: MNS Raj Thackeray Special Post Over Queen Elizabeth II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.