Raj Thackeray: राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा, १ मे रोजी जाहीर सभा तर ५ जूनला अयोध्येला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:14 PM2022-04-17T12:14:57+5:302022-04-17T12:19:58+5:30
भोंग्याचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.
पुणे – भोंगे हटाव ही मोहीम धार्मिक नाही तर सामाजिक आहे. देशातील न्यायव्यवस्थेपेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर ३ तारखेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात आणि देशात कुठल्याही प्रकारची दंगल नको. शांतता भंग करण्याची गरज नाही. प्रार्थनेला कुणाचाही विरोध नाही. भोंगे हटणार नसतील तर आमच्याही आरत्या तुम्हाला ऐकायला लागतील असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा बुलंद केला आहे.
राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.
राज ठाकरेंचा पुणे दौरा
हनुमान जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खालकर चौकातील मारुती मंदिरात शनिवारी मारूतीची महाआरती केली. हनुमान जयंतीचा मुहूर्त व राज ठाकरे यांनी ‘तुमचे भोंगे काढा, अन्यथा आम्ही आमची हनुमान चालिसा लावू’ म्हणून दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर या महाआरतीला अभूतपूर्व गर्दी झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली चांदीची गदा उंचावून ठाकरे यांनी या गर्दीला अभिवादन केले. राज यांनी कृतीतून बरेच काही दाखवून दिले. सहा वाजताची वेळ असताना ते साडेसात वाजता मंदिरात आले. मंदिरात जाऊन राज यांनी मारुतीची सांग्रसंगीत पूजा केली. आरती संपल्यावर लगेचच मंदिराच्या आवारात बसलेल्या सालसर मंडळाने हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. ते पूर्ण होईपर्यंत राज चौथऱ्यावर उभे होते.
भोंगे हटवा असं आदेशात म्हटलं नाही – गृहमंत्री
न्यायालयाने आपल्या निर्णयात मशिदींवरील भोंगे उतरवा असे कुठेही म्हटले नाही. न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपनाला बंदी घातली आहे. त्यामुळे, ज्या मशिदींनी, मंदिरांनी परवानगी घेतली आहे आणि कायद्याचं पालन जे करत आहेत, तेथील लाऊडस्पीकर काढायचा प्रश्नच येत नाही असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून, तेथे हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे.