“ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, असली-नकली कोण ते लवकरच कळेल”; मनसेचा ठाकरे गटाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 04:27 PM2024-04-23T16:27:51+5:302024-04-23T16:28:54+5:30
MNS Raju Patil News: उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही. राजकारण करा. पण नरेटिव्ह सेट करू नका, असे मनसेने म्हटले आहे.
MNS Raju Patil News: लोकसभा निवडणुकीच्या पुढील टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग आला आहे. यातच राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे नेते, पदाधिकारी समन्वय साधत आहेत. महायुतीच्या प्रचाराला लागले आहेत. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर अलीकडेच एक कार्यअहवालही सादर करण्यात आला. यानंतर मनसेने ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.
ही लोकसभा निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. त्यामुळे कोण नकली, कोण असली हे लवकरच कळेल. याबाबत जास्त काही बोलत नाही. राजकारण करा, परंतु नरेटिव्ह सेट करू नका. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार हे पाहत आहोत, असे मनसे नेते आणि आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना राजू पाटील यांनी ठाकरे गटावर टीका केली.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून साधी विचारणाही केली नाही
एवढ्या राजकीय घटना घडल्या असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही. घराशेजारी शपथविधी होता, तेव्हा सांगितले नाही. नरेटिव्ह सेट करून लोकांसमोर जाऊन बोलू नका. आमच्याकडे बोलण्यासारखे खूप आहे. तुम्ही आम्हाला विचारणार नाही, मग आम्ही आमचे राजकारण का करू नये? राज ठाकरेंनी आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी महायुतीला पाठिंबा देण्याचा हा निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा असेल किंवा विधानसभा आम्हाला विचारले, समर्थन मागितले. त्यामुळे मी हे बोलत आहे, असे राजू पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, महायुती उमेदवारांसाठी मेळावा घेणार आहे. महायुतीचे उमेदवार आमच्या मेळाव्यात असतील. राज ठाकरे यांच्या सभा होणार की नाही, याविषयी अद्याप स्पष्ट नसले तरी किमान चार-पाच सभा होतील अशी शक्यता आहे, असे राजू पाटील यांनी म्हटले आहे. तसेच श्रीकांत शिंदेंना विरोध माझा वैयक्तिक अजेंडा नाही. काही पर्सनल अजेंडा घेऊन कलगीतुरा केला नाही. जे काही बोललो ते कामावरून बोललो. विरोध केला म्हणून त्यांच्या कार्यअहवालात कामे दिसून येत आहेत तसेच त्यांनी माझ्या मतदारसंघात जास्त विकास निधी दिला आहे, असे राजू पाटील म्हणाले.