Sandeep Deshpande : "खोके सामनामध्ये पोहोचले का?"; शिंदे-फडणवीस सरकारच्या जाहिरातीवर मनसेचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 11:49 AM2022-11-03T11:49:29+5:302022-11-03T12:02:46+5:30
MNS Sandeep Deshpande And Shivsena : सामनातून शिंदे फडणवीसांवर सातत्याने टीका होत असताना आता जाहिरात छापून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या जाहिरातीवरून मनसेने ठाकरे गटाला खोचक सवाल विचारला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच ठाकरे गटाने देखील वारंवार खोके सरकार म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. अशातच आता शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या सामनामध्ये शिंदे-फडणवीस सरकारची पहिल्या पानावर जाहिरात छापून आली आहे. सामनातून शिंदे फडणवीसांवर सातत्याने टीका होत असताना आता जाहिरात छापून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या जाहिरातीवरून मनसेने ठाकरे गटाला खोचक सवाल विचारला आहे.
"खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवालच मनसेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे सरकारची जाहिरात सामनात छापून आल्याने त्यावरून निशाणा साधण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून ठाकरे गटाला टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "खोके सामनामध्ये पोहोचले का?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
"खोके" सामना मध्ये पोहचले का??? pic.twitter.com/bvZvkZgV2y
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 3, 2022
सामनाच्या पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात छापून आली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्ष… एका वर्षात 75,000 रोजगार देण्याचा महाराष्ट्राचा महासंकल्प. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम, असा या जाहिरातीवर मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी या महासंकल्प कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
या जाहिरातीत सर्वात वरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. तर जाहिरातीच्या मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नियुक्तीपत्रांचं वाटप करतानाचा फोटो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची नावे आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"