“उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन”; मनसेने व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाला डिवचले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 09:27 AM2024-04-11T09:27:40+5:302024-04-11T09:30:19+5:30
MNS Sandeep Deshpande News: ‘चला आरश्यात बघूया’, असे सांगत मनसेने ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.
MNS Sandeep Deshpande News: मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेचा संदीप देशपांडे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. यानंतर आता एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली होती. तसेच नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवणारे उद्धव ठाकरेंचेही अनेक व्हिडिओ आहेत. ते आम्ही दाखवू शकतो, असा इशारा दिला होता. यानंतर आता संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओच्या पोस्टला ‘चला आरश्यात बघूया’, असे कॅप्शन देत ठाकरे गटाला डिवचले आहे.
उद्धव ठाकरेंचे मोदींना वचन
संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या एका सभेतील भाषणाचा काही भाग दाखवण्यात आला आहे. तर सोबत उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे फोटो दाखवण्यात आले आहेत. “यावेळेला इकडे तिकडे कुठेही न पाहता, न फुटता, तुम्ही सगळ्यांनी हात वर करून एक मला विश्वास द्या की, नरेंद्रभाईंना आम्ही वचन देतो की, मुंबईतील सहापैकी सहा खासदार त्यांच्यासोबत आम्ही दिल्लीत पाठवणार. बस्स. नरेंद्रभाई तुम्हाला विश्वास दिला आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईने एकदा ठरवले की, मागे हटत नाही. मुंबई संकटाला घाबरत नाही. मुंबई देशाचा आधार आहे. हा आधार, ही मुंबई, हा महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक हे आपल्या सोबत आहेत.”, असे उद्धव ठाकरे या व्हिडिओत सभेतील उपस्थितांना सांगताना दिसत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे सोडून गेलेल्या आमदारांच्या जीवावर विधान परिषदेचे आमदार झाले. एवढा स्वाभिमान असेल, तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतही याच सोडून गेलेल्या खासदारांच्या जीवावर राज्यसभेवर गेले. त्यांनीही राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि लोकसभा लढवावी. संजय राऊतांमध्ये तेवढी हिंमत आहे का, असे थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.
चला आरश्यात बघूया pic.twitter.com/rEK5l0FAhZ
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 11, 2024