Shalini Thackeray : "सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच काढता पाय घेतला"; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 07:55 PM2022-05-16T19:55:32+5:302022-05-16T20:05:29+5:30
MNS Shalini Thackeray And Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
मुंबई - शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या 13 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. पण चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले. यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.
"सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला" असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्यांच्यावर नाही तर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सोपविली होती. सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.....!!! सच हमेशा कडवा होता है.......!!!! मानो या न मानो....!!!!" असं शालिनी ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कारण दादूला पण माहिती आहे की, हिंदुत्वाची खरी जबाबदारी त्याच्यावर नाहीतर माननीय राजसाहेब यांच्यावर धर्मवीर आनंद दिघे साहेब यानी सोपविली होती.सत्य पाहायला जमले नसते म्हणूनच पाय काढता घेतला.....!!!
— Shalini Thackeray (@ThakareShalini) May 16, 2022
सच हमेशा कडवा होता है.......!!!!
मानो या न मानो....!!!! pic.twitter.com/g5MxPQzVVS
आयनॉक्समध्ये ‘धर्मवीर’चा खास शो ठेवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी आले. चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. विशेषत: अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. ‘मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. प्रसाद ओक यांनी इतकी जिवंत व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांचा अभिनय फारच जबरदस्त आहे. प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्या लकबी हुबेहुब साकारल्या आहेत. त्यांनी हे सर्व कसं केलं माहित नाही. हा चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहे. पण मी जाणीव पूर्वक चित्रपटाचा शेवट पाहिला नाही. कारण तो फारच त्रासदायक आहे. जेव्हा ही घटना घडली होती तेव्हा स्वत: बाळासाहेब देखील फार भावूक झाले होते. आनंद दिघे गेल्यानंतर व्यथित झालेले बाळासाहेब मी पाहिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शेवटच्या सीनमध्ये काय आहे?
‘धर्मवीर’ चित्रपटाच्या शेवटच्या 10 मिनिटात आनंद दिघे यांच्या जीपला झालेल्या अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. हा प्रसंग कोणत्याही शिवसैनिकाला भावूक करणारा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा प्रसंग पाहण्याचं टाळलं. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला सध्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 1.90 कोटी रूपयांचा बिझनेस केला.