भिवंडीतील कशेळी टोलनाक्यावर रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने मुंडण करुन घातले श्राद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 05:42 PM2021-09-01T17:42:47+5:302021-09-01T17:44:03+5:30
गणपती आगमना पूर्वी खड्डे भरा अन्यथा टोल बंद करण्याचा दिला इशारा...
नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडी ठाणे या रस्त्याची खड्ड्यां मुळे पूर्णतः दुरावस्था झाली असून कशेळी येथील टोल नाक्यावर टोल वसुली मात्र राजरोस सुरु असून या रस्त्यावर तात्काळ खड्डे दुरुस्ती करा अन्यथा टोल वसुली बंद करा या मागणी करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कशेळी टोल नाका येथे बुधवारी मुंडण करून श्राद्ध आंदोलन करण्यात आले. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी ,मदन पाटील ,मनोज गुळवी, संतोष साळवी,शिवनाथ भगत,परेश चौधरी, शरद नागावकर,संजय पाटील,अशरफ खान मोतीवाले,भरत पाटील, कामिनी खंडागळे यांसह असंख्य मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ठाणे भिवंडी हा रस्ता बीओटी तत्वावर बनवण्यात येऊन या ठिकाणी टोल वसुली सुरू असून रस्त्यावरच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो रस्त्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक तसेच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे .अंजुर फाटा ते कशेळी या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अवघ्या सात किलोमीटर चे अंतर पार पाडण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तासाचा वेळ लागत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागत आहे . त्यामुळे अनेक वाहन चालकांना मानेचा ,कमरेचा ,पाठीच्या आजाराला देखील समोरे जावे लागत आहे. तर अनेक अपघात घडून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे . या रस्त्यावर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर टोलवसुली का केली जाते असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करून या दुरावस्थेस टोल वसूल करणारी कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग हे कारणीभूत असून त्या विरोधात टोल नाका येथे मनसे कार्यकर्त्यानी ब्राम्हणांच्या मंत्रघोषात श्राद्ध आंदोलन करून दोन कार्यकर्त्यानी मुंडन केले.
खारबाव कामण रस्त्यावरील दुरावस्थे बाबत मनसेने आंदोलन करून ही दुरुस्ती न झाल्याने टोल नाका फोडला तेव्हा दुरुस्ती सुरू झाली सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याबाबत तसे करणे अपेक्षित आहे का असा सवाल उपस्थित करीत कशेळी टोल नाका ते अंजुर फाटा रस्ता गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी करीत जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये असा इशारा देखील या ठिकाणी मनसेच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी श्रीमती शिंदे यांना निवेदन देताना दिला. तर या रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून ते काम गणपती पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन श्रीमती शिंदे यांनी दिले आहे. या प्रसंगी कोणतीही अनुचित घटना घडू नये या करीत नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी स्वतः पोलीस अधिकारी कर्मचारी यांसह चोख असा पोलीस बंदोबस्त टोल नाक्यावर ठेवला होता.