नाशिकसाठी मनसेची धडपड

By Admin | Published: January 6, 2017 04:05 AM2017-01-06T04:05:33+5:302017-01-06T04:05:33+5:30

महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा सत्तेचा अनुभव घेणाऱ्या मनसेने आता सत्ता कायम राखण्यासाठी धडपड चालविली असून,

MNS struggle for Nashik | नाशिकसाठी मनसेची धडपड

नाशिकसाठी मनसेची धडपड

googlenewsNext

नाशिक : महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा सत्तेचा अनुभव घेणाऱ्या मनसेने आता सत्ता कायम राखण्यासाठी धडपड चालविली असून, बड्या उद्योगसमूहांच्या माध्यमातून साकारलेल्या प्रकल्पांचे ब्रॅण्डिग करत ‘करून दाखवले’चा नारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
सेना-भाजपालाही सत्तेचे वेध लागले असून, दोहोंनी तूर्त तरी स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने मरगळलेल्या कार्यकर्त्यांत प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. २०१२मध्ये राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर ४० नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पक्षाला सत्ता मिळाली. पहिली अडीच वर्षे भाजपाबरोबर तर नंतरच्या अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अपक्षांचे गट मिळून स्थापन झालेल्या महाआघाडीबरोबर संसार थाटणाऱ्या मनसेची गेल्या पाच वर्षांत कामगिरी यथातथाच राहिली.
पाच वर्षांत कधी पूर्णवेळ आयुक्त न देऊन तर कधी कामकाजात हस्तक्षेप करत राज्य सरकारने खोडा घातल्याचा आरोप राज ठाकरे यांनी वारंवार केला. परंतु, त्यांनी निवडणुकीत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासंबंधी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. नाशिककरांमध्येही तीच भावना रुजवण्यास विरोधक यशस्वी ठरले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४०पैकी तब्बल २६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे पक्षाघात झालेल्या मनसेची अवस्था दयनीय बनली आहे.
रतन टाटांच्या माध्यमातून बॉटनिकल गार्डन, मुकेश अंबानींच्या माध्यमातून गोदापार्क, शिर्के उद्योग समूहाकडून होळकर पुलावर वॉटर कर्टन व जिनिव्हा कारंजा तर जीव्हीकेमार्फत साकारलेले इतिहास वस्तुसंग्रहालय या प्रकल्पांचे ब्रॅण्डिंग केले जात आहे. सेना-भाजपा युती होवो ना होवो, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी करत लढण्याची तयारी नाशिकमध्ये ठेवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: MNS struggle for Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.