संभाजीराजेंना मनसेचा पाठिंबा, छत्रपती घराण्याला मत देणं हे माझं भाग्य – आमदार राजू पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 11:35 AM2022-05-26T11:35:50+5:302022-05-26T11:36:43+5:30
आम्हाला राजकारण आणायचं नाही. पक्षात या, तिकीट देऊ अशा अटी राजेंना घालण्याची गरज नव्हती असं मनसेनं म्हटलं आहे.
मुंबई – राज्यसभेच्या ६ जागांसाठी मोठी चूरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपा २, शिवसेना १, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी १ निवडून येतील. परंतु सहाव्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी सर्व विधानसभा सदस्यांना पत्र पाठवून पाठिंबा देण्यासाठी विनंती केली आहे. आता मनसेच्या एकमेव आमदाराने संभाजीराजेंना पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली आहे.
याबाबत आमदार राजू पाटील म्हणाले की, संभाजीराजेंनी सगळ्यांनाच फोन आणि ईमेल केले आहेत. मलाही फोन आला होता. मी राजसाहेबांना विषय सांगितला. त्यावर राजसाहेबांनी काय विषयच नाही. त्यांना पाठिंबा दे असं सांगितले. काही पक्षांना आमची एलर्जी आहे. चांगल्या भावनेने आम्ही संभाजीराजेंना पाठिंबा दिला आहे. मनापासून आम्ही छत्रपती संभाजीराजेंसोबत आहे. माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. माझे मत छत्रपती घराण्याला देणार आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत आम्हाला राजकारण आणायचं नाही. पक्षात या, तिकीट देऊ अशा अटी राजेंना घालण्याची गरज नव्हती. संभाजीराजेंना सर्व पक्षांनी पाठिंबा द्यायला हवा. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी सर्वांनी मिळून त्यांना द्यायला हवी असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मनसेचा छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा #MNS@YuvrajSambhaji@rajupatilmanasepic.twitter.com/pniaUjveiJ
— Lokmat (@lokmat) May 26, 2022
संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
शिवसेनेकडून दबावतंत्र
राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात येत असला तरी अजूनही हा शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग समजला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांना संधी दिली जावी या हालचाली थांबलेल्या नाहीत. शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या पातळीवर कोणतीही नवी घडामोड नव्हती. मुंबईत थांबून ते विविध लोकांच्या संपर्कात होते. शिवसेनेने मात्र एक पाऊल पुढे टाकत संजय पवार यांचा अर्ज दाखल करण्याची तयारी केली. त्यामुळे ही कोंडी कायम राहिली. तुमचा आम्ही जरूर सन्मान करू; परंतु तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा..तुम्हाला आमची मते तर हवीत आणि पक्षीय बांधीलकी नको हे कसे चालेल या भूमिकेवर शिवसेना ताठर आहे. त्यामुळेच त्यांनी हेतुपुरस्सर कोल्हापूरचा आणि त्यातही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे.