भगतसिंग कोश्यारींचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय; मनसेनं झापलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 05:42 PM2022-11-19T17:42:43+5:302022-11-19T17:43:07+5:30
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी परत माती खाल्ली, परत त्यांचा तोल गेला. ज्या विषयामधलं राज्यपालांना कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता? असा सवाल मनसेने केला.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळात आदर्श होते असं विधान करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. राज्यपालांच्या या विधानावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात मनसेनेही राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची वेळ आलीय अशा शब्दात मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे.
प्रवक्ते गजानन काळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी परत माती खाल्ली, परत त्यांचा तोल गेला. ज्या विषयामधलं राज्यपालांना कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता? राज्यपालांनी सुधारायचं नाही अस ठरवलेलं दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी निश्चित घ्यावा पण छत्रपती शिवरायांशी तुलना नको. छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ,वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले राज्यपाल?
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा, छत्रपती संतापले
राज्यपाल असे का बडतात मला माहिती नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या असं मी परवा सुद्धा म्हटलं होते. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील, संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसे शकते. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसे? अशी संतप्त विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"