"हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार; कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:22 AM2023-08-05T11:22:08+5:302023-08-05T11:23:07+5:30

मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे

MNS targets ruling BJP government from Mumbai-Goa highway | "हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार; कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची?"

"हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार; कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची?"

googlenewsNext

मुंबई – दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडतात. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. निष्पापांचे जीव गेलेत. परंतु खड्ड्यांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यास सरकारला अपयश येत आहेत. संसदेत मंत्री नितीन गडकरी आणि राज्याच्या विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिलेल्या उत्तरामुळे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार अशी स्थिती या हायवेच्या कामात निर्माण झालीय का असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.

मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे. त्यावर मनसेनं म्हटलं की, अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले. सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका..असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस?

मुंबई-गोवा महामार्गावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्याकडे यावर भाष्य करण्यासारखं काही नाही. मला उत्तर देताना खेद वाटतो. देशात मुंबई-गोवा आणि सिंगरौली या महामार्गावर पुस्तक लिहिलं जाऊ शकते. दुर्दैवी आहे, माझ्याकडे याबाबत उत्तर नाही असं त्यांनी संसदेत म्हटलं. तर मुंबई-गोवा महामार्गाबाबत अनेक कायदेशीर, कंत्राटदारांच्या अडचणी येतायेत. स्वत: गडकरींनी इतका प्रयत्न करूनही ज्यांनी देशभरात रेकॉर्डब्रेक रस्ते बांधले, पण त्यांनाही मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामात अनेक अडचणी आल्या, यश आले नाही असं देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत खंत व्यक्त केली.

मुंबई-गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय

वडखळ ते कोलाडमध्ये गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव येथून पुढे इंदापूरपर्यंत रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना लहान-मोठ्या वाहनांसह, अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार ते सहा फूट रुंदीचे व सुमारे एक ते दीड फूट खोलीचे हे खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी भरल्याने वाहने खड्ड्यात आदळून कित्येकदा त्यांचा तोल जाऊन अपघात होतो. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांची कसोटी लागते.

Web Title: MNS targets ruling BJP government from Mumbai-Goa highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.