मनसेचे ठरले, आता पुढील लक्ष्य बारामती! राज ठाकरे लवकरच घेणार मेळावा; पदाधिकारी कामाला लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:45 AM2023-09-03T11:45:18+5:302023-09-03T11:47:12+5:30
MNS Raj Thackeray: राज ठाकरेंनी विश्वासू माणसावर बारामतीची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले जात असून, लवकरच मनसेचा मोठा मेळावा होणार आहे.
MNS Raj Thackeray: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष बांधणीवर भर देताना पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राजपुत्र अमित ठाकरे राज्यातील विविध ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. आता मात्र मनसेचे पुढे लक्ष्य बारामती असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे लवकरच बारातमी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याची माहिती देण्यात आली असून, यासाठी पदाधिकारी कामाला लागले आहेत.
बारामती हा पवारांचा गड मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. यानंतर आता बारामतीवासीयांचा कल कोणाकडे असेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आताच्या घडीला मनसेच नाही तर बारामतीकडे राज्यातील प्रमुख नेत्याचे लक्ष असल्याचे दिसत आहे. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते बारामतीत दौरे करत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी मध्यंतरी बारामतीत दौरा केला होता. त्यांच्यासोबतच बाकी नेतेही बारामतीत काबीज करायच्या तयारीत आहे. मात्र, राज ठाकरेंनी तगड्या माणसाकडे बारामतीची जबाबदारी सोपवली आहे. नाराजीवरून सातत्याने चर्चेत असलेल्या पुण्याचे वसंत मोरे यांच्या खांद्यावर बारामतीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
बारामती शहरात राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार
राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षामुळे मनसेने आता बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे बारामती दौऱ्यावरती आले होते. कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती मोरे यांनी पत्रकारांना दिली. बारामती मतदारसंघातील तालुक्यात दौरा सुरू असून, पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. वसंत मोरे यांनी निवडणुका लढणे यावर बोलणे टाळले. लवकरच राज ठाकरेंचा बारामती शहरात कार्यकर्ता मोठा मेळावा होणार आहे. त्यासाठीच बारामतीत आलो आहे, असे वसंते मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मनसे सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी अनेकदा बोलून दाखवले. मनसेकडून पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. ते सध्या बारामतीकडे जास्त लक्ष देत आहे. या मतदारसंघात मनसे वाढवण्याच्या तयारी दिसत आहे. त्यामुळे वसंत मोरे बारामती दौरा करत आहेत.