मनसे उपाध्यक्ष सेनेत जाणार?
By admin | Published: March 16, 2017 02:51 AM2017-03-16T02:51:52+5:302017-03-16T02:51:52+5:30
मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तर काही जण अन्य पक्षांत जाण्याच्या तयारीत आहेत
राजू काळे , भार्इंदर
मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासूनच काहींनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तर काही जण अन्य पक्षांत जाण्याच्या तयारीत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मर्जीतील असलेले उपाध्यक्ष अरुण कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पतपेढी निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. त्याचबरोबर अंतर्गत कुरघोडीमुळे ते जेरीस आले आहेत.
१९९२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. कदम यांचे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वासोबत बिनसल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्या वेळी त्यांनी मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाने त्यांच्यावर मीरा-भार्इंदरची धुरा सोपवली. पक्षाच्या शहराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून विकासाविरोधातील धोरणांविरोधात आंदोलने केली. २००७ मधील पालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाचे चार नगरसेवक निवडून आणले. २००९ मध्ये झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या विजयाला अप्रत्यक्ष हातभार लावला. त्यांनी आपले निकटवर्तीय व माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांना आमदारकीच्या निवडणुकीत भाजपाचे नरेंद्र मेहता यांच्याविरोधात उतरवले. यात मेहता पराभूत झाले.
२०१२ मध्ये त्यांनी पाणीसमस्येबाबत पालिकेवर मोर्चा काढला होता. काही काळ राजकारणातून बाजूला झालेले कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी मेहेरनजर दाखवून त्यांच्यावर उपाध्यक्षपदासह भार्इंदर शहर (जिल्हा) व पालघर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. २०१६ मध्ये झालेल्या पालिका कर्मचारी पतपेढीतील पक्षाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला.